बदाम लागवड,काजू लागवड,बाजरी लागवड,चंदन लागवड

बदाम लागवड-:


भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते, तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सुमारे ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे.

जमिनीचा प्रकार
या पिकासाठी खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन बदाम वृक्षांना उपयुक्त असते कारण त्यांची मुळे खोल जातात.

हवामान
थंड पण कोरडी आणि फळे पिकण्याच्या वेळी गरम हवा बदामास आवश्यक असते तसेच ६० सेंमी.किंवा थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते.

पिकाची जात
कॅलिफोर्नियापेपर,द्रके,IXL,मर्सेड,मुखदूम,ने -प्लस अल्ट्रा,नॉन-परेल,प्राण्याज,प्रिमोर्सकिज,शालीमार,शेल,वारिस,

लागवड
भारतात बियांपासून बहुतांश लागवड होते. त्याकरिता जुले-सप्टेंबरात जमविलेले बी डिसेंबर मध्ये पन्हेरीत पेरतात व वर्षानंतर रोपे बाहेर कायम जागी लावतात. याशिवाय कलमांनीही निवडक वाणांची लागवड करतात. वृक्षांची लागण करण्यास ६ - ८ मी.अंतरावर १ मी. व्यासाचे खोल खड्डे करतात.

खत व्यवस्थापन
कंपोस्ट खते व नायट्रोजनुक्त खते माती परीक्षण करून द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
या पिकासाठी पावसाळ्यामध्ये थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते तसेच उन्हाळ्यात पिकाच्या आवश्यकते नुसार पाणी द्यावे.

उत्पादन
रोपे लावल्या पासून सुमारे तीन ते चार वर्षांत फळे येण्यास सुरवात होते. आठ ते दहा वर्षांत भरपूर उत्पन्न मिळते.साधारणत जुलै ते सप्टेंबर मध्ये फळातून आठळ्या डोकावू लागतात. त्या वेळी ती फळे काढून हातांनी सोलून आठळ्या उन्हात वाळवितात. काश्मीर मध्ये प्रत्येकी एका झाडापासून २.७ किलो ग्राम फलोत्पादन होते. याची साठवणूक आठळ्या थंड,कोरड्य व हवा खेळणाऱ्या जागेत ठेवल्यास सहा महिन्यां पर्यंत टिकतात. तसेच शीतगृहात ठेवल्यास अधिक काळ टिकून राहू शकतात.


काजू लागवड-:


काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडी खालील क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

जमिनीचा प्रकार
पाण्याचा निचरा होणारी जमीन व जांभ्या दगडा पासून तयार झालेल्या वरकस जमिनीत हे पीक चांगले येते.

हवामान
काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. स्वच्छ व भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक आहे.

पिकाची जात
वेंगुर्ला-१,२,३,४,६,८

लागवड
राज्यात ७ X ७ मीटर किंवा ८ X ८ मीटर अंतरावर लागवडीसाठी शिफारस आहे,५ X ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्टरी ४०० झाडे बसतात.

खत व्यवस्थापन
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत,जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते.लागवडीसाठी वेंगुर्ला- १ ,वेंगुर्ला- ४ ,वेंगुर्ला- ६,वेंगुर्ला- ७ ,वेंगुर्ला- ८ या जातींची कलमे निवडावीत.लागवड करण्यासाठी एप्रिल- मे महिन्यांत ७ मीटर बाय ७ मीटर किंवा ८ मीटर बाय ८ मीटर अंतर ठेवून ६० बाय ६० बाय ६० सें. मी.आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यात दोन घमेली शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. कलमांची लागवड पाऊस स्थिरावल्यानंतर करावी. कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी.आळ्यात गवताचे आच्छादन करावे.उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.

रोग नियंत्रण
कलमांची लागवड करताना प्रत्येक खड्यात १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २ ते ३ घमेली शेणखत घालावे.लागवडीनंतर एक वर्षाने झाडांना ऑगस्ट महिन्यात खालीलप्रमाणे खतांची मात्रा द्यावी.

उत्पादन
मोहोर आल्यानंतर काजू बिया पक्व होण्यास सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागतो. काजू बोंड पूर्ण पक्व झाल्यावर काढून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ दिवस प्रखर उन्हात वाळवावे.


बाजरी लागवड-:

पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे. कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात. सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो. बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.

जमिनीचा प्रकार
अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

हवामान
उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. ४०० ते ५०० मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात. पिकाची उगवण व वाढ २३ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

पिकाची जात
श्रध्दा, सबुरी, शांती हि संकरित वाण आहेत तसेच आय.सी.टी.पी.-८२०३,समृद्धी,परभणी संपदा हि सुधारित वाण आहेत.

लागवड
खरीप बाजरीची पेरणी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. तर दोन रोपांमध्ये १२ ते १५ सें.मी. अंतर राहील अशा बेताने करावी. पेरणी शक्‍यतो दोन चाड्याच्या पाभरीने ( तिफण ) करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते.

खत व्यवस्थापन
अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर ही अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात. माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

रोग नियंत्रण
भुंगे - या किडीचा उपद्रव बाजरी पीक फुलोऱ्यात असताना होतो. यावर उपाय म्हणून बी एच सी १० टक्के पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळतात. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.

उत्पादन
श्रध्दा या वाणाचे हेक्टरी उत्पन्न २६ क्विंटल तर एम एच १७९ या वाणाचे उत्पन्न सरासरी २२ क्विंटल मिळते. बाजरीच्या इतर वाणांचे उत्पन्न १५ ते २० क्विंटल मिळते.चंदन लागवड-:

चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा - समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस - जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते. 

चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. 

चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियांपासून रोपे तयार केली जातात. याशिवाय बियाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करतात. बियापासून ५० ते ६०% पर्यंत सुकणारे कोरडे तेल (ड्राईंग ऑईल) मिळते. ते इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी उद्योगात वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. 

रोपे तयार करणे : चंदनाचे बी लागवडीनात्णार बियांभोवती असणाऱ्या कठीण कवचास तडा देऊन कोंब बाहेर येतो. बियाचे टरफल कालांतराने पडून जाते किंवा सुकते. लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. 

ताजे बियाणे २ महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत असते. याचे कारण म्हणजे एकतर कठीण कवच किंवा कवचामधील जे रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. याकरिता जर्मिनेटर ५० मिली, प्रिझम ५० मिली, १ लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्तावस्था नष्ट होऊन १ ते १।। महिन्यात अंकूरताना दिसतात. एरवी ३ महिन्यापर्यंत देखील अंकुरलेली दिसत नाहीत. 

२ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही. 

गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत : गादीवाफे २ प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे १० मिटर x १ मीटर आकाराचे करून १५ सेंमी उंची ठेवावी. यामध्ये लालमाती व चाळलेली वाळू २:१ प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले ४ किलो बी पसरून घेऊन त्यावर २ सेंमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट ५०%) करावी. 

बी उगविल्यानंतर गवताचे अच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर - जानेवारीत पेरावे. 

पिशवीत रोपे लावणे : बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर २५ ते ३० दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. 

रोपांवर दर १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने सप्तामृत २५० मिली १०० लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे ६ ते ८ आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. ६ ते ८ महिन्यामध्ये रोपे २५ ते ३० सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात. १ किलो बियापासून साधारणपणे २००० रोपे तयार होतात. 

लागवड: मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्टमध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १६' x १२' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (२५० ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते. 

चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड २ - ३ वर्षांनी मरते. 

पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी १ लि. जर्मिनेटर चे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना ५० ते १०० मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी. 

यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा , लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते. 

यजमान मध्यम आयुषी झाडे : यामध्ये हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, पांगारा, बकुळ, कुंचला, बारतोंडी इ. 

यजमान फळझाडे : सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर. 

यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.

अभ्यासाअंती असे समजते की, यजमान वृक्ष म्हणून सुरू, करंज, शिरीष, काशिद, साग, सिसम हे वृक्ष चंदनास योग्य/उत्तम समजली गेली आहेत. तर फळझाडांमध्ये आवळा, बोर, सिताफळ, डाळींब आणि मध्यम आयुषी झाडांमध्ये शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा हे वृक्ष योग्य ठरतात. 

आंतरपीक : चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान १० फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले ४ - ५ वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी , काळमेघ, भुई रिंगणी, शतावरी, कोरपड, अशी पिके घेता येतात. 

जमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. चंदनाचा गाभा आणि त्यापासून निघणारे तेल हे एक आर्थिककदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन आहे. अभ्यासाअंती असे लक्षात येते की खडकाळ, दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते. परंतु दोन्ही प्रकारच्या जमिनीतून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलाची गुणवत्ता सारखीच आढळते. 

हवामान : चंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते. 

पाणी: चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. 

चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून २ वेळा तरी पाणी द्यावे.

आंतरमशागत : लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये १ मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने १५ सेमीपर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम ते १ किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात. 

रोग कीड : चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये मुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोडपोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो. यांचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताच्या फवारण्या वेळीच कराव्यात. प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलच्या दर्जावर परिणाम होणार नाही. 

चंदनाचा गाभा : चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल मिळते. सुगंधी गाभा हा तुरट, कडू, ताप निवारक, थंड, उल्हासित, कडक, जड, टिकाऊ, मधुर आणी तिव्र वासाचे, दोष विरहीत पिवळसर अथवा तपकिरी रंगाचे, सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तंतुमय तेलकट गाठी विरहीत असतो. फिक्या रंगाच्या गाभ्यामध्ये गडद रंगाच्या गाभ्यापेक्षा तेलाचे प्रमाण जास्त असते. चंदन तेलाचे प्रमाण १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडात ०.२ ते २%, तर परिपक्व झाडात २.८ ते ५.६% असते. मुळापासून शेंड्याकडे ४५% पर्यंत तेलाचे प्रमाण कमी होत जाते तर गाभ्याच्या मध्यबिंदूपासून ते बाह्य भागापर्यंत २०% पर्यंत कमी होत जाते. 

गाभा तयार होण्याचे काम ४ वर्षाच्या पुढे सुरू होते. तर नैसर्गिक रित्या ते ७ वर्षाच्या पुढे होते. १२ ते १५ वर्षात १२ ते १५ सेंमी व्यासाच्या वृक्षापासून ३० ते ३५ किलो सुगंधी गाभा मिळू शकतो. 

गाभ्यापासून तेल: गाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात. तर ताज्या पानांपासून फिक्कट पिवळे मेण मिळते. 
बदाम लागवड,काजू लागवड,बाजरी लागवड,चंदन लागवड बदाम लागवड,काजू लागवड,बाजरी लागवड,चंदन लागवड Reviewed by admin on January 30, 2019 Rating: 5
Powered by Blogger.